गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दिवस..
वर्षाचे सर्व दिवस आपण आपल्या वैयक्तिक ,सामाजिक अडी-अडचणी ,दुःख समस्या, प्रश्न हे श्री गुरूंना सांगत असतो आणि त्या प्रश्न ,समस्या दूर व्हाव्यात अशी मनोभावे प्रार्थना करतो. आज मात्र हे करायचं नाहीये कारण आज गुरुपौर्णिमा आहे हा दिवस आपल्या गुरुप्रती कृतज्ञता आणि शरणागतीचा दिवस आहे. आजवर श्री गुरुदेवांनी आपल्यावर कायम केलेल्या कृपे विषयी, त्यांनी सदैव घेतलेल्या काळजी विषयी ,त्यांच्या असीम प्रेमाविषयी आभार प्रदर्शन करण्याचा महत्त्वाचा दिवस. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यातील आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस “गुरुपौर्णिमा“म्हणून स्वीकारला आहे. या ही वर्षी २१ जुलै , वार (रविवार )२०२४ रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे. या विशेष दिन प्रसंगी गुरुचे आपल्या जीवनात असलेले महत्त्वाचे स्थान ,गुरुची महिती या लेखाच्या माध्यमातून मी थोडक्यात वर्णन केलेली आहे.
महर्षी व्यासांनी वेदांचे चार भाग, सहा शास्त्रे ,अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे .या सर्वांतून भगवंतांचे गुणगान ,त्यांचे यश गाणं करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे .या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरीने व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या पावन दिवसाला व्यासपौर्णिमा ,गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे प्रेम आदर्शाचं प्रतीक मानले जाते .गुरुवर प्रेमाचा ,आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच होय. सर्व विद्या, वेद ,पुराने यांची माहेरघर ,मूळ स्रोत, आद्य गुरु म्हणून व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेस “व्यासपौर्णिमा“ असेही संबोधले जाते . अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे ,गुरुजनांचे , आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते. त्यांच्याकडून गुरुमंत्र , दीक्षा,शिक्षण घेतले जाते. गुरु बद्दल श्रद्धा ,कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे .या दिवशी गुरुची विधिवत पूजा केली जाते. प्राचीन काळी श्री गुरु व्यास एवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे अशी शास्त्रात कथन केले आहे एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना ’व्यासांचा मागवा घेतू ’असे म्हणून सुरुवात केली. व्यासपौर्णिमेच्या दिवशी ’ओम नमोस्तुते व्यास ,विशाल बुद्धे ’अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात , परंपरा आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचे उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती आजमिती पर्यंत चालू आहे. गुरु दोन प्रकारचे असतात .एक गुरु! एक सद्गुरु! अवधूतांनी अधुराजाला उपदेश करताना सांगितले की–
“जो –जो जयाचा घेतला गुण | तो म्यां गुरु केला जाण |
गुरुसी पडले अपारपण | जग संपूर्ण गुरु दिसे“ ||
असे सांगून श्री गुरुदेव अवधूतांनी २४ गुरु केले. या २४ चे महत्व तीन प्रकारात आहे. एक –सदगुण अंगीकारासाठी गुरु, दोन –त्यागासाठी गुरु, तीन –ज्ञानप्राप्तीसाठी गुरु म्हणजे गुरु हे लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील. गुरुचरित्र या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुच्या ध्यानांचे सेवा,भावाचे, पूजनाचे महत्त्व सांगितले आहे .तसेच गुरु हाच ब्रह्मा ,विष्णू ,महेश हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रम्ह तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या आधीन होतो. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत ,या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु– शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. शुक्राचार्य जनक, कृष्ण– सुदामा,संदीपनी ऋषी, विश्वामित्र– राम, लक्ष्मण, परशुराम– कर्ण, द्रोणाचार्य –अर्जुन अशी एक उच्च श्रेणीची गुरु शिष्य परंपरा भारतीयांना लाभली. एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ ,निवृत्तीनाथांचे गहिनीनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ ,एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी ,विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण, शिवरायांचे गुरु संत तुकाराम ,कल्याण स्वामींचे गुरु रामदास असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील. आत्मज्ञान हे सद्गुरूंचे स्वरूप आहे .गुरु म्हणजे अढळ श्रद्धा, अढळ श्रद्धेने सर्व साध्य होते. भारतीय संस्कृतीत गुरुला नेहमीच पूजनीय मानले गेले आहे .गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. गुरु– शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा ,म्हणून गुरुची प्रार्थना करावयाची तो हा दिवस होय. गुरु हा ब्रह्मदेवांप्रमाणे सदगुणांचा पोषक व महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे. मानवाच्या अज्ञानी, असुरी वृत्तींवर संयम ठेवावा लागतो ,ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरूपासून मिळते. जीवनात खरा मार्गदर्शक गुरुच असतो.
ब्रह्मानंद परम सुखद केवलम ज्ञानमूर्ती |द्वंद्वातीत गगन सदृश्य |
एक नित्य विमल मचल |सर्वधीसाक्षी भूतंम् |
भावातीत त्रिगुण रहितम् |सद्गुरु त नमामि ||
गुरु हा ब्रह्मा पदाचा आनंद ,परम सुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच. त्याचे ठिकाणी द्वेत भावना नसते आकाशासारखा विशाल हृदयाचा मूलतत्त्व मीच आहे ही जाणीव असणारा, नित्य आहे. त्याला अंत नाही. विमल शुद्ध ब्रह्मज्ञानी सर्व ठिकाणी साक्षी भूत असणारा ,सत्व, रज तमाच्यही ही पलीकडे असणारा असा आहे. गुरु पूजन हे सत्याचे ,ज्ञानाचे ,ध्यानाचे पूजन असते. गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता, जिज्ञासा, सेवाभाव शिकतो. ज्ञानाचे अमृत पिऊन तृप्त होतो .मनुष्याच्या जीवनसागरात गुरु हा दीपस्तंभ असतो. तसाच जीव व शिव यांचे मिलन घडून आणणारा गुरु हा साक्षात परब्रम्हाच होय. गुरूंचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरु पौर्णिमेचा उद्देश आहे. गुरूंच्या पूजनाने पाप नष्ट होते आणि मनाला शांती लाभते. श्री गुरूंच्या छायेत बसल्याने मन व बुद्धीचा विकास होतो .विद्यादान हे न संपणारे श्रेष्ठ असे शाश्वत ज्ञान आहे.’ गुरुसे शिष्य सवाई व्हावा’ अशीच गुरूंची आंतरिक इच्छा असते. असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत झाले आहेत.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे .जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने– घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही .त्याप्रमाणे गुरु जवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे .“गुरु बीन ज्ञान कहासे लावू “? हेच खरे आहे....! दत्त भक्तांसाठी हा पुण्य पावन दिवस! या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पंचोपचार पूजा करतो. सद्गुरु नी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द कार्य चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन ! गुरूंच्या उपकाराने आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –
गुरु: ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा |
गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||
तेव्हा आज तुम्हाला शक्य होईल त्या दत्त मंदिरात ,दत्त मठात,स्वामी केंद्रात ,मठात किंवा कोणत्याही समाधीस्थ सत्पुरुषांच्या मठात जाऊन मनोभावे दर्शन घ्या. डोळे मिटून ध्यान करा .नामस्मरण करा. त्यांना प्रिय असणारे नैवेद्य समर्पित करून तोच प्रसाद घ्या. आणि हे सर्व उपचार झाले की फक्त कृतज्ञभाव व्यक्त करून त्यांच्या पवित्र चरणांशी तुमची शरणागती अभिव्यक्त करा. त्यांना फुल –ना –फुलाची पाकळी अर्पण करा .एक दिवसीय उपवास करू शकता. स्तोत्र ,भजन, मंत्र ,आरती ध्यानधारणा करा. आजचा संपूर्ण दिवस फक्त कृतज्ञ भावातच रहा.... गुरु हा देवा पेक्षाही श्रेष्ठ असतो तोच या एक जगात तुमची सर्वार्थाने काळजी घेण्यास समर्थ असतो. दृढ विश्वास , सश्र्धता, करूणा, आस्था आणि प्रेम, आपुलकी या गुणांनी आपण गुरु प्रेमास प्राप्त होऊ शकतो.
श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु पूजन खालील प्रमाणे करावे.
१) एक पळी साधे पाणी 2 )एक पळी गंधोधक पाणी 3)एक फुल गंध अक्षदा वाहने (मूर्तीवर स्वामींच्या) स्वामी मूर्तींची पंचोपचार पूजा, पाद्यपूजन करून स्वामी महाराजांना प्रार्थना केली जाते. पाद्यपूजन करून तीर्थ प्राशन करताना खालील मंत्र म्हणावा.
“ अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशन |श्री स्वामी समर्थ पादोदक तीर्थ जठरे धारम्यामह |शिरसाधरम्यामह |
स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा केला जातो .दोन्ही हात जोडून प्रार्थना केले जाते.
येथे स्वामी महाराजांना आद्य गुरूचे स्थान देऊन गुरु पूजन केले जाते.
🌺श्री स्वामी समर्थ🌺
नाव : सौ. शैलजा जगदीश कुलकर्णी.
आळंदी, पुणे.